सामान्य नागरिकांसाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’: मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम
मुंबई: सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर करण्यासाठी (ईज ऑफ लिव्हिंग) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम घोषित केला आहे. त्यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हीसी) सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून पुढील शंभर दिवसांत प्राधान्याने राबवायच्या कामांसाठी सविस्तर निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचा आदेश दिला आहे. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करून, माहिती अधिकार कायद्यानुसार आवश्यक माहिती आधीच उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा करणारे किमान दोन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमेवर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे, खराब झालेली वाहने निर्लेखित करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छ प्रसाधनगृह यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नागरिकांसाठी अधिकारी कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात येणाऱ्या उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्यांनी उद्योजक आणि संबंधित विभागांशी संवाद साधून ‘ईज ऑफ वर्किंग’ साठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे निर्देश दिले.
तालुका आणि गाव पातळीवरील शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेट देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक पातळीवरील समस्या तालुका आणि जिल्हा स्तरावरच सोडवण्यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या या सात कलमी कृती कार्यक्रमामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि सामान्य नागरिकांच्या जीवनातील अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.